आयोगाच्या कामाचा वाढता दबाव आणि अचानक बोलावलेल्या बैठकांच्या सत्राने एका उमद्या शिक्षकाचा बळी घेतला आहे. मतदारयादी सखोल पुनरावलोकन मोहिमेअंतर्गत उपजिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला जात असताना, दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ४० वर्षीय प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे यांचा मृत्यू झाला.
ज्ञानेश्वर रोटे (रा. रोटेवाडी, अहिल्यानगर) हे लोहगाव भागात वास्तव्यास होते आणि वडगाव शेरी मतदारसंघात ‘बीएलओ’ (बूथ लेव्हल ऑफिसर) म्हणून कार्यरत होते. सोमवारी दुपारी १२:३० च्या सुमारास, उपजिल्हाधिकाऱ्यांनी अचानक बोलावलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते घाईने निघाले होते. धानोरी-लोहगाव रस्त्यावरील स्पार्क स्प्रिंग सोसायटीजवळ त्यांची दुचाकी अचानक घसरली. रोटे यांनी हेल्मेट घातले होते, तरीही ते तोंडावर जोरात आदळल्याने त्यांना गंभीर जखमा झाल्या. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेबाबत बोलताना जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, “ही घटना दुर्दैवी आहे, मात्र कामाच्या दबावामुळे हा अपघात झाला, असा दावा करणे चुकीचे आहे. महिनाभरापासून सर्व बीएलओ चांगले काम करत असून त्याचे सकारात्मक निकालही दिसत आहेत.”
शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा प्रचंड ताण
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रोटे यांच्यावर मतदार पडताळणी आणि डेटा मॅपिंगच्या कामाचा मोठा दबाव होता. रविवारी सुटी असतानाही त्यांनी दिवसभर निवडणूक केंद्रावर काम केले होते. “त्यांच्यावर काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार ताकीद दिली जात होती. अशातच अचानक बोलावलेली ही बैठक त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली,” अशी भावना त्यांच्या एका सहकाऱ्याने व्यक्त केली. शिक्षकांना अध्यापनाऐवजी निवडणूक आणि इतर अशैक्षणिक कामांत जुंपण्याच्या पद्धतीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यंत्रणा वादाच्या भोवर्यात
शिक्षकांना त्यांच्या मूळ अध्यापन कार्याव्यतिरिक्त निवडणूक आणि इतर कामांना जुंपण्याच्या पद्धतीवर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “शिक्षकांना अशा कामांसाठी टोकाला का नेले जात आहे? या हानीला जबाबदार कोण?” असा प्रश्न ज्येष्ठ शिक्षकांनी विचारला आहे. शवविच्छेदनानंतर रोटे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अहिल्यानगर येथे नेले जाणार असून तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
एक हसमुख व्यक्तिमत्व हरपले
मूळचे अहिल्यानगरचे असलेले रोटे हे अत्यंत हुशार आणि मनमिळावू शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ११ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
