पिरंगुट, लवळे,चांदे, नांदे गावांचा समावेश पौड पोलीस स्टेशन अंतर्गत करावा – सभापती मंदाताई शेळके
पौड प्रतिनिधी -: कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळणारा आश्रय मोडून काढण्याची आवश्यकता असून, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने काम करणे अपेक्षित आहे, मुळशी तालुक्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा बागडा पोलीस प्रशासनाने अधिक कठोर करावा व पिरंगुट,लवळे चांदे, नांदे या गावांचा पुन्हा पौड पोलीस स्टेशन अंतर्गत पुणे ग्रामीण कडे जोडण्यात यावा अशी मागणी मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच पिरंगुट लवळे चांदे, नांदे ही गावे पिंपरी चिंचवड आयुक्ताकडे वर्ग केल्यामुळे बावधन पोलीस स्टेशन अंतर्गत शहरीकरणाचा अधिक लोड आहे यामुळे मुळशी तालुक्यातील स्थानिक नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात व तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय पोलीस स्टेशन या एका छताखाली असेल तर नागरिकांचा नाहक त्रास कमी होतो यासाठी पौड पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात यावे अशी विनंती पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्याशी भेटून चर्चा करून सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांनी निवेदन देत मागणी केली आहे.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दाखवत लवकरच या संदर्भात पाऊले उचलू असे आश्वासन मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई शेळके यांना दिले आहे.
