अजितदादांच्या निधनानंतरचा पत्रव्यवहार अमान्य करावा; सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र

Pune अजित पवार यांचे निधन झाले त्या २८ जानेवारीपासून ते १० मार्च २०२६ पर्यंतच्या कालावधीत पक्षाच्या वतीने इतर कुणी निवडणूक आयोगाकडे केलेला पत्रव्यवहार अमान्य करावा, असे पत्र अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या या पत्रामुळे पक्षातील काही नेत्यांबद्दल त्यांनी अविश्वास दाखवला असल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना न सांगता निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. १६ फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सह्यांचे एक पत्र आयोगाला देण्यात आले. त्यात अध्यक्षांच्या निधनामुळे कार्याध्यक्षांकडे म्हणजे पटेल यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार असल्याचे कळवण्यात आले होते. असा दावा रोहित पवार यांनी केला.

तटकरेंचा पलटवार

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काय – काय घडामोडी घडल्या, याबाबत आपल्याकडे संपूर्ण माहिती आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांच्या विरोधात काय – काय कट कारस्थान रचले गेले, याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आहे, ते सगळे आपल्याला बोलावे लागेल, असा इशारा तटकरे यांनी दिला.