भारतात मागील आठवड्याभरामध्ये चार वेळा इंधनाचे दर वाढले असून याचा भुर्दंड सर्वसामान्यांना बसत आहे. राज्याबरोबरच देशातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन तुवडा असून ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणि वाहनं घेऊन पेट्रोल पंपांबाहेर लांबच्या लांब रांगा लावल्या आहेत.
अनेक ठिकाणी इंधनासाठी ताटळात उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडला आहेत. असं असतानाच आता पुढल्या महिन्याभरामध्ये इंधनदरांचा भडका उडेल असं भाकित महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने केलं आहे. इतकेच नाही तर लॉकडाऊनसारखे दिवस येतील असंही या नेत्याने म्हटलं आहे. या नेत्याने नागरिकांना एक महत्त्वाचं आवाहनही केलंय. नेमका हा नेता कोण आणि त्याने या विषयांवर काय काय म्हटलंय जाणून घेऊयात…
पेट्रोल 170 तर डिझेल 150 पर्यंत जाणार
राज्याच्या विधानसभेतील माजी विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे विद्यमान नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इंधनाच्या दरांचा भडका उडणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी लोकांना पैसे जपून ठेवण्याचा सल्लाही दिलाय. “पाच सात नाही तर पुढच्या महिन्यात दीड महिन्यामध्ये डिझेल 150 रुपयांपर्यंत झालेलं दिसेल. तर पेट्रोल 170 रुपये झालेले दिसेल. ज्या पद्धतीने देश चालवला जात आहे ते पाहता हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे असं वाटतंय. देशातील मध्यमवर्गीय माणूस मरणार आहे. याला मारण्यासाठी ते सरकार आलेलं आहे,” अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.
मग आरसी बूक पाहून इंधन का दिलं जातंय?
“इंधन तुटवडा नाही असे सरकार सांगत असेल, केंद्रीय मंत्रीकडून तुटवडा नाही असं सांगितलं जात असेल, भाजपकडून असं सांगितलं जात असेल तर आरसी बूक पाहून डिझेल का दिलं पाहिजे? शेतकरी ट्रॅक्टर कशासाठी वापरतो त्याला आरसी बूक पाहून जर इंधन द्यायला लागले तर याचा अर्थ तुटवडा आहे, हे मान्य करा. भविष्यात ते होणार आहे. एअर इंडियाचे विमान सेवा कमी झाली अनेक विमानसेवा नागपूरवरूनही रद्द होतील,” असं भाती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनसारखे दिवस येणार; पैसे जपून ठेवा
एवढ्यावरच न थांबता वडेट्टीवार यांनी, “लॉकडाऊनसारखे दिवस येणार आहेत. उरलेले पैसे असतील तर सुरक्षित ठेवा कुठे. फार काही गुंतवणूक करू नका,” असं आवाहनही केलं. त्याचप्रमाणे, “जी गुंतवणूक केली तर ती परत येणार नाही. बँका रिकाम्या झाल्यात. रिझर्व बँक रिकामी झाली आहे. रिझर्व्ह बँकेचा पैसा स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे काढून घेण्याचे काम सुरू आहे. भविष्यात बँकाही पूर्णता उध्वस्त होतील. सगळ्याच बाजूने देश संकटात आहे. अडचणीत आहे फक्त इव्हेंटवर भर दिला जात आहे. ते सगळ्याच बाजूने अडचणीत आहेत. फक्त इव्हेंटवर भर दिला जात आहे,” अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
निवडणूक आयोग भाजपचे दलाल
एसआयआर सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यासंदर्भात विचारलं असता, “सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे त्याला सोडून द्या त्यावर टिपणी करणार नाही. मात्र निवडणूक आयोग हे भाजपचे दलाल आहे, हे लपलेलं नाही. हे आजही करत होतो आणि उद्याही सांगत राहणार आहे. काय कारवाई करायची आहे, ते त्यांनी सांगावे. जो धिंगाणा सुरू आहे जे बंगालमध्ये झालं, जे बिहारमध्ये झालं या ठिकाणी यांची सत्ता येऊ शकत नव्हती. एस आय आरच्या नावावर मतदान मिळवण्याचे. विरोधकांचे मतदान कमी करून सगळे इलेक्शन जिंकत आहेत,” असा आरोप वडेट्टीवारांनी केला.
धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
बकरी ईदच्या कुर्बानीविरोधात कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेनं घंटानाद आंदोलन केल्याने निर्माण झालेल्या तणावावबद्दल विजय वडेट्टीवार यांच्याकडे विचारणा करण्यात आली. “देशात ध्रुवीकरण करण्याचा वातावरण सुरू आहे. तेढ निर्माण करण्याचा धंदा झालेला आहे. यांनी जाहीरनाम्यात टाकायला पाहिजे. संविधानाची भाषा कशाला करायची. दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सतत सुरू आहे. मंत्री असंवेदनशील आहे. हिंदू-मुस्लीम हा त्रस्त आहे, लोक त्रस्त आहे. त्यामुळे तणाव निर्माण करायचा आवश्यक महत्त्वाचे प्रश्नांना बगल द्यायची हा राजरोसपणे धंदा सुरू आहे. जनतेच्या भावना भडकवायच्या तणाव निर्माण करायचा राजकारण करायचं आणि लोकांना मारायचं,” असं म्हणत वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
