पश्चिम हवेली तालुक्यातील सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावीत; शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी

पुणे : राज्य सरकारने राज्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असून, पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, हवेली तालुक्याचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. पश्चिम हवेलीच्या सीमेलगत असलेले भोर आणि राजगड तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे पश्चिम हवेलीतील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन या भागातील सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत हवेली पंचायत समिती मा. सदस्य नितीन वाघ, रामदास गायकवाड, अरुण घोगरे, पप्पू गायकवाड, सागर शिर्के, सौरभ मोकाशी, गुरुदत्त हगवणे, चेतन पायगुडे, अजित पायगुडे आणि आकाश डिंबळे यांनी हवेली तहसीलदार अर्चना निकम यांच्याकडे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम हवेली परिसराच्या सीमेलगत असलेल्या भोर आणि राजगड तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. या परिसरात खडकवासला, पानशेत आणि वरसगाव यांसह धरणे आहेत. यावर्षी खडकवासला धरण परिसरात पानशेत व वरसगाव परिसराच्या तुलनेत कमी पाऊस झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पश्चिम हवेली आणि राजगड तालुक्यातील अनेक गावे एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे शेजारील गाव दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होते आणि दुसऱ्या बाजूला हवेली तालुक्यातील गावाचा त्यामध्ये समावेश होत नाही, ही विसंगती दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या काही काळापासून या भागात पावसाचे प्रमाण कमी असून, भातशेती वाळण्यास सुरुवात झाली आहे. भुईमूग, घेवडा तसेच इतर कडधान्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसाची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आगामी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मसूर, वाटाणा आदी पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पश्चिम हवेलीतील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून ती शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी आणि पश्चिम हवेली तालुक्यातील सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अर्चना निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.