Pune वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी फोन करण्याची गरज आता कमी होणार आहे. कारण, एखाद्या भागातील वीजपुरवठा बंद पडताच त्याची माहिती थेट स्मार्ट मीटरद्वारे महावितरणच्या नियंत्रण कक्षाला मिळणार आहे.
यासाठी विशेष सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम महावितरणकडून सुरू करण्यात आले आहे.
स्मार्ट मीटरद्वारे थेट नियंत्रण
महावितरणकडून राज्यातील शहरांसह ग्रामीण भागातही ‘स्मार्ट प्रीपेड आणि पोस्टपेड मीटर’ बसवण्याची मोहीम वेगाने राबवली जात आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वीज वापरावर ग्राहकांना अधिक नियंत्रण मिळत असून, महावितरणच्या ‘महाविद्युत’ अॅपद्वारे अचूक माहिती उपलब्ध होत आहे.
बिल थकले तर वीजपुरवठा आपोआप बंद
स्मार्ट मीटर प्रणालीमुळे दोन महिन्यांचे वीजबिल थकले असल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित केला जात आहे. तसेच प्रीपेड मीटर वापरणाऱ्या ग्राहकांचे रिचार्ज संपल्यास रिमोटद्वारे वीजपुरवठा तत्काळ बंद केला जातो.
मात्र, ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने बिल भरताच तातडीने वीजपुरवठा पुन्हा सुरू केला जात असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. ही सेवा २४ तास सुरू असणार आहे.
वीज गेल्यावर महावितरणला आपोआप माहिती
पूर्वी वीज गेल्यानंतर ग्राहकांना कॉल सेंटरवर फोन करून तक्रार करावी लागत होती. आता स्मार्ट मीटरद्वारेच वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. त्यामुळे नेमका बिघाड कुठे झाला आहे, हे तातडीने समजणार असून दुरुस्तीचे कामही वेगाने होणार आहे.
मीटर रीडिंगसाठी कर्मचारी येणे बंद
पूर्वी प्रत्येक घरात जाऊन मीटर रीडिंग घेण्यासाठी कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले जात होते. मीटर रीडिंगनंतर ग्राहकांना घरी वीजबिल मिळत होते.
मात्र आता डिजिटल यंत्रणेमुळे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन झाली आहे. मीटर रीडिंग रिमोटद्वारे घेतले जात असून, ग्राहकांना वीजबिल थेट मोबाईल किंवा ई-मेलवर पाठवले जात आहे. त्यामुळे मीटर रीडिंगसाठी कर्मचारी घरी येण्याचे प्रमाण जवळपास बंद झाले आहे.
ग्राहकांना मिळणार डिजिटल सुविधा
स्मार्ट मीटर प्रणालीमुळे ग्राहकांना वीज वापराचे रिअल-टाइम अपडेट, ऑनलाइन बिल पेमेंट, तातडीची सेवा आणि पारदर्शक बिलिंग यांचा फायदा मिळणार आहे. महावितरणची ही डिजिटल पायरी भविष्यात वीज व्यवस्थापन अधिक सक्षम आणि जलद करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
