रिंग रोडच्या ठेकेदारामुळे मुळशीत पूरस्थिती; शिवाजी बुचडे यांचा गंभीर आरोप

घोटावडे, आंधळे,रीहे, कातरखडक खांबोली,पिंपळोली आदि गावांना उत्खननाचा फटका

रिंग रोडच्या चुकीच्या कामामुळे मुळशीतील अनेक गावांना फटका; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, अन्यथा सर्वपक्षीय जनआंदोलन – शिवाजी बुचडे पाटील

मुळशी प्रतिनिधी :
मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या रिंग रोड प्रकल्पाच्या चुकीच्या नियोजनामुळे व अति उत्खननामुळे घोटावडे, आंधळे, रिहे, कातरखडक, खांबोली, पिंपळोली तसेच परिसरातील अनेक गावांना मोठा फटका बसल्याचा गंभीर आरोप पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे पाटील यांनी केला आहे.

मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणावर शेतजमिनीतील सुपीक माती वाहून गेली असून शेतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था होऊन नागरिकांचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता विशाल भोईटे, उपअभियंता गायकवाड तसेच संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पूरग्रस्त व बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी घोटावडेचे माजी सरपंच आनंद घोगरे, पिंपळोलीचे माजी सरपंच अविनाश खणेकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहणीदरम्यान नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी व एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित मदत मिळावी, पावसामुळे बाधित झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू करावी आणि नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी शिवाजी बुचडे पाटील यांनी केली.

याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास सर्वपक्षीय जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी संबंधित प्रशासन व ठेकेदार कंपनीला दिला.