दैनंदिन जनजीवन विस्कळीत; तालुक्यातील विविध ठिकाणची केली पाहणी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे – काजल अंकुश मोरे

पंचायत समितीच्या सदस्य काजल अंकुश मोरे यांनी केली पूरग्रस्त गावाची प्रशासनासोबत पाहणी

मुळशी प्रतिनिधी : – मुसळधार पावसामुळे मुळशी तालुक्यातील पौड, मुळशी खुर्द, गोणवडी, पळसे, वारक, ताम्हिणी, आदरवाडी, आंदेशे, मांदेडे, निवे, दावडीवस्ती व मोहरी या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने तसेच शेती व मालमत्तेचे नुकसान झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित गावांना भेट देऊन पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या.

याचवेळी अधिकाऱ्यांसमवेत (ताम्हिणी) येथे भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली

यावेळी तहसीलदार विनयकुमार चोबे साहेब, पोलीस निरीक्षक गिरी गोसावी साहेब, सर्कल अधिकारी अर्चना रोकडे, तलाठी राहुल हगवणे, सहाय्यक कुणाल साखरे, माजी सरपंच संदीप बामगुडे (ताम्हिणी) आदि सहकारी उपस्थित होते.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना बाधित भागात तातडीने आवश्यक उपाययोजना राबविणे, रस्ते सुरळीत करणे, वीज व पाणीपुरवठा पूर्ववत करणे तसेच नागरिकांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या.