रिंगरोडच्या बेजबाबदार कामकाजाने शेतकरी उद्ध्वस्त; सभापती मंदाताई शेळके यांनी प्रशासनाला फैलावर घेतले

आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या सूचनेनंतर घटनास्थळी पाहणी; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा

पौड | प्रतिनिधी : मुळशी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, सुरू असलेल्या रिंगरोडच्या कामातील त्रुटींमुळे अनेक रस्ते वाहून गेले आहेत. तसेच शेतात पाणी शिरल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या सूचनेनुसार मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाबाजी शेळके यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह बाधित भागाची तातडीने पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पाहणीदरम्यान सभापती मंदाताई शेळके यांनी रिंगरोडच्या कामातील नियोजनातील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रिंगरोडच्या चुकीच्या कामकाजामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नागरिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नुकसानग्रस्त भागात तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र जनआंदोलन उभारावे लागेल, असा स्पष्ट इशारा सभापती मंदाताई शेळके यांनी प्रशासनाला दिला.