Pune | विनानिविदा कचरा प्रक्रिया प्रस्ताव ठेका अखेर रद्द

Pune News उरूळी देवाची येथे ५०० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विनानिविदा देण्यात आलेला प्रस्ताव अखेर महापालिका प्रशासनाने मागे (रद्द) घेतला आहे.

हा प्रकल्प आता नियमित निविदा प्रक्रियेद्वारेच राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

महापालिकेच्या स्थायी समितीसमोर अलीकडेच कामकाज नियमावलीतील कलम ५:२:२ नुसार हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानुसार भूमी ग्रीन एनर्जी या कंपनीला ५०० टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प देण्याचा प्रस्ताव होता. यामध्ये १०+१० अशा २० वर्षांसाठी प्रति टन ६९० रुपये टिपिंग फी आणि दरवर्षी १० टक्के वाढ अशी तरतूद करण्यात आलेली होती.

दरम्यान काँग्रेस नगरसेवक प्रशांत जगताप यांनी इतक्या दीर्घ कालावधीसाठी विनानिविदा प्रस्ताव आणण्यास तीव्र विरोध दर्शवत हा विषय कार्यपत्रिकेवर घेण्याची मागणी केली होती. यानंतर हा प्रस्ताव स्थगित झाला आणि प्रशासनावर टीकेची झोड उठली. तर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि गटनेते चंद्रकांत कदम यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेत आयुक्तांवर राजकीय दबावाखाली काम केल्याचा आरोप केला. विशेषत: भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला लाभ देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.

“प्रकल्पाचा कालावधी अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्ताव स्थायी समितीकडे जाण्यापूर्वीच तो मागे घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यापूर्वी स्वाक्षरी झाल्याने तो समितीकडे गेला. तसेच या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नाही. लवकरच ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा काढण्यात येईल.” – नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

याबाबत आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, हडपसर परिसरातील उघड्यावर साचणाºया कचºयाचा प्रश्न गंभीर असून त्यावर न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. त्यामुळे ओल्या कचºयावर तातडीने प्रक्रिया करणे आवश्यक होते. नवीन प्रकल्प उभारण्यास ८ ते १० महिने लागणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या कंपनीलाच काम देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. दरम्यान, अरविंद शिंदे यांनी या प्रकरणातील संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच स्थायी समितीकडे सादर केलेला प्रस्ताव सार्वजनिक करावा, अशीही त्यांनी मागणी केली आहे.