मुळशी पॅटर्न’ नावाच्या वापरावर मुळशीत नाराजी; पुनीत बालन यांच्या वक्तव्याला प्रवीण धनवे यांचे जोरदार प्रत्युत्तर

मुळशी, पुणे : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी एका पॉडकास्टदरम्यान ‘मुळशी पॅटर्न’ या नावाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मुळशी तालुक्यात नाराजीचा सूर उमटला आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य प्रवीण अंकुश धनवे यांनी मुळशीकरांच्या भावना आणि अस्मितेचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे.

एखाद्या भागाचे नाव घेऊन आपल्या कल्पनेनुसार काल्पनिक कथानक तयार करणे आणि त्यातून संपूर्ण परिसराची ओळख नकारात्मक पद्धतीने मांडणे हा त्या भागावर अन्याय असल्याचे प्रवीण धनवे यांनी म्हटले आहे.

मुळशीला समृद्ध इतिहास, संस्कृती, सामाजिक परंपरा आणि स्वतंत्र ओळख आहे. मात्र, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून ‘मुळशी पॅटर्न’सारख्या नावातून परिसराची नकारात्मक प्रतिमा निर्माण होणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“युवा उद्योजक पुनीत दादा बालन यांना आम्ही आदर्श आणि प्रेरणास्थान मानत होतो; मात्र ‘मुळशी पॅटर्न’च्या संदर्भातील त्यांच्या वक्तव्यामुळे आमचा भ्रमनिरास झाला. मुळशीकरांच्या भावना आणि अस्मितेबाबत त्यांच्याकडून अधिक संवेदनशील भूमिकेची अपेक्षा होती,” असे प्रवीण अंकुश धनवे यांनी म्हटले.

“मुळशी ही केवळ एका चित्रपटाच्या किंवा काल्पनिक कथानकाच्या नावापुरती मर्यादित नाही. मुळशीचा इतिहास, संस्कृती आणि मुळशीकरांची अस्मिता यांचा आदर राखला गेला पाहिजे. मनोरंजनाच्या नावाखाली संपूर्ण परिसराची नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ नये,” अशी भूमिका धनवे यांनी मांडली.

मुळशीकरांच्या भावना लक्षात घेऊन सार्वजनिक वक्तव्य करताना संबंधितांनी जबाबदारीने भूमिका मांडावी, तसेच कोणत्याही परिसराची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.