Pune शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा आमदार राहुल पाटील यांनीच गाजवली. खासदार बंडू जाधव यांना धु धू धुताना ‘आपण चोर पाळले, हीसुद्धा आपली चूक झाली,’ असेही त्यांनी ठाकरेंसमोरच सांगून टाकलं.
तसेच, इथला खासदार गेला तरी जाऊ द्या; पण परभणीचे चारही आमदार शिवसेनेनेच निवडून आणू, असा शब्दही आमदार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
परभणीच्या सभेत आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, जाहीर सभेला लाजवेल, असा प्रतिसाद आपल्या मेळाव्याला लाभला आहे, त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की, गेलेले गद्दार हे चोर होते आणि आपण चोर पळाले, ही सुद्धा आपली चूक झालेली आहे. ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांना लोक म्हणतात बंडखोर. पण मी म्हणतोय ते गद्दारच आहेत.
उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम या सहा खासदारांनी केले आहे आणि आम्ही लोकांच्या कामासाठी गेलो आहोत, असे ते सांगत आहेत. तुम्ही स्वतःच्या कामासाठी गेलात की जनतेच्या?, हे सर्वांना माहिती आहे. आता तुमचं काम झालं ना? तुम्हाला हात जोडून विनंती की, तुम्ही आता जावा, आमचं काम करू नका. हे चोरांच्या टोळीत सामील झाले आहेत, असा हल्लाबोल राहुल पाटील यांनी केला.
ते म्हणाले, आपल्या खासदारांना दोनदा आमदार आणि तीनदा खासदार केले आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोचवायचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. तीन तीन वेळा लोकसभेत पाठवूनही हा माणूस गद्दार होतो, म्हणजे हा माणूस कोण होता, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे
राहुल पाटलाला पाडायला खासदार दारोदारी फिरले
राहुल पाटलाला पाडायला एखादा अल्पसंख्याक उमेदवार मिळतोय हे पाहण्यासाठी २०२४ मध्ये हे खासदार दारोदारी फिरले. त्यांनी कोणतीही निवडणूक माझ्यासाठी सोपी केली नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारी ही माणसं आहेत. ज्यांनी मताला, पक्षाला विकलं त्यांनी जनतेचाही अपमान केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुम्ही किती पैसे घेतले हे सर्वांना महितीय
ते म्हणाले, हे सहा जण म्हणतात की विकासाठी मी आम्ही सत्तेत गेलो. पण तुमच्यात धमक असेल तर विरोधात राहूनही तुम्हाला काम करता येतं. तुम्ही स्वार्थासाठी पळून गेला आहात, तुम्ही किती रुपये घेतले, हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे आम्हाला ज्ञान शिकवू नका. असल्या गोष्टी या परभणीत चालणार नाहीत.
