Pune News पावसाळी कामे करणार्या ‘एम्.बी. पाटील कन्स्ट्रक्शन’ या मोठ्या ठेकेदाराला वाचवण्यासाठी महापालिकेच्या अधिकार्यांनी मुख्य सभेत खोटी माहिती दिली. या ठेकेदाराकडील कामे चालू झाली नसतांनाही मलनि:स्सारण विभागाने सभेच्या प्रश्नोत्तरात कामे चालू असल्याचे सांगितले.
महापालिकेच्या मुख्य सभेत विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी खोटी उत्तरे देत असतील, तर अशा अधिकार्यांना बडतर्फ करणेच योग्य ठरेल ! असे दायित्वशून्य अधिकारी स्वत:चे नोकरीतील कर्तव्य कसे पार पाडतात ? यावर शंका निर्माण होते ! हे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
१. सुहास टिंगरे यांनी प्रश्नोत्तरात ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना’च्या संदर्भात वडगाव शेरी मतदारसंघातील २२ कामांविषयी माहिती मागितली होती.
२. मलनि:स्सारण विभागाने ‘एम्.बी. पाटील कन्स्ट्रक्शन’ या ठेकेदाराला २२ कामे दिली असून ४ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १० कामे चालू असल्याचे सांगितले.
३. टिंगरे यांनी महापालिकेच्या अधिकार्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. तेव्हा केवळ २ कामे चालू होती.
४. त्यांनी हा प्रकार स्थायी समितीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिला. संबंधित अभियंते आणि ‘प्रायमो कन्सल्टंट आस्थापन’ यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली; मात्र संबंधित ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे म्हणाले की, शहरातील पूर परिस्थितीला केवळ अवेळी पाऊस नाही, तर महापालिकेने पोसलेले ठेकेदारही उत्तरदायी आहेत. या ठेकेदारांवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे.
