सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांची पुणे जिल्हा परिषद पशुवर्धन व दुग्धशाळा समितीवर सदस्यपदी निवड

पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. या पार्श्वभूमीवर मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांची यापूर्वी कृषी समितीवर सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यानंतर आता त्यांची पुणे जिल्हा परिषद पशुवर्धन व दुग्धशाळा समितीवरही सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

मुळशी तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत असताना, शेळके यांना जिल्हा परिषद स्तरावरही महत्त्वाच्या समित्यांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित प्रश्नांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मंदाताई शेळके या भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे आमदार यांचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या निवडीमुळे स्थानिक पातळीवर राजकीय व सामाजिक कार्याला बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.