NCP News : पार्थ पवारांनी घेतला पुण्यातील पहिला राजीनामा : राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे यांनी राजीनामा दिला आहे. संघाच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी (ता. २५) मुख्यालयात पार पडली.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी बदलाच्या दृष्टीने योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या. या बैठकीनंतर ढमढेरे यांनी खासदार पार्थ पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार दरवर्षी एका तालुक्यातील संचालकांना पदाधिकारीपदी संधी देण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली होती. सध्या पदाधिकारी बदलाचा विषय डिसेंबर महिन्यापासून सुरू होता. त्यावर प्राधान्याने चर्चा झाली. मात्र, काही कारणांनी पदाधिकाऱ्यांनी तत्काळ राजीनामा देण्याचे अमान्य केल्याने संचालकांमध्ये तणावाचे वातावरण झाल्याचे पाहायला मिळाले.

अध्यक्षपदाचा राजीनामा व्यवस्थापकीय संचालक यांना त्यांच्या नावे द्यायचा असतो तो त्यांच्याच नावाने दिला आहे. मात्र, पक्षाचे नेते खासदार पार्थ पवार यांच्याकडे तो सोपविला आहे. त्यानुसार खासदार पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी माहिती स्वप्नील ढमढेरे यांनी दिली. तर, व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी आपल्याकडे राजीनामा प्राप्त झाला नसल्याचे सांगितले.

आता नवीन अनुभवी संचालकांना संधी द्यायची की पूर्वी ठरल्यानुसार तालुकानिहाय संधी द्यायची, की पुढील पंचवार्षिक निवडणूक मार्च 2027 मध्ये होणार असल्याने 8 ते 9 महिन्यांसाठी वेगळा निर्णय घ्यायचा याबाबत पक्षाकडून अंतिम आदेश देण्यात येणार असल्याची माहिती काही संचालकांकडून मिळाली.