पुणे जिल्हा परिषदेचा ऐतिहासिक निर्णय; शहरालगतच्या गावांमध्ये इयत्ता दहावी पर्यंतचे वर्ग सुरू होणार

भाजपा गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे पाटील यांच्या मागणीला मोठे यश

पुणे प्रतिनिधी -: पुणे जिल्हा परिषदेने शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निर्णय घेतला असून, शहरालगतच्या गावांमध्ये इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहराकडे जावे लागणार नाही, तसेच त्यांच्या शिक्षणाची सातत्यता राखण्यास मोठी मदत होणार आहे.

पुणे शहरालगत वाढत्या विस्तारामुळे अनेक गावांमध्ये शैक्षणिक सुविधा अपुरी असल्याची बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीच्या आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, जिल्हा परिषद शाळांमध्ये पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत व काही शाळांमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध होते मात्र नववी व दहावीनंतर येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते शिवाजी बुचडे पाटील यांनी हा मुद्दा मांडला व त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती विवेक वळसे पाटील यांनी तात्काळ हा निर्णय घेऊन इयत्ता दहावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

माण हिंजवडी जिल्हा परिषद गटाबरोबर या निर्णयाचा फायदा संपूर्ण जिल्ह्यातील शहरालगतील गावांना होणार आहे यामुळे पालकांची चिंता आता मिटणार आहे

या निर्णयामुळे पालकांवरील आर्थिक व मानसिक ताण कमी होणार असून, विशेषतः मुलींना शिक्षणासाठी सुरक्षित आणि सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच शाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, शिक्षकांची उपलब्धता आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावरही भर देण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन केले असून, लवकरच संबंधित गावांमध्ये वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, शिक्षण क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.