तलाठी भरतीची परीक्षा आता MPSC घेणार, प्रक्रिया कशी असणार? जाहिरात कधी निघणार?

Mpsc exam 

राज्यातील लाखो तरुणांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून महसूल विभागातील तलाठी पदांची भरती आता पूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा घेणार आहे.

त्यामुळे तलाठी भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारांना आळा बसणार आहे.

तलाठी परीक्षा खासगी कंपन्यांकडून घेतली जात असल्याने परीक्षेत गैरप्रकार होत असल्याची टीका अनेकदा होत होती. त्यामुळे सरळसेवा भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने अनेक वर्षांपासून सुरू होती. हीच मागणी विचारात घेऊन राज्य शासनाने निर्णय घेतला.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना आपल्या विभागातील जिल्हानिहाय रिक्त तलाठी पदे आणि आरक्षण तपासून ८ मेपर्यंत शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर प्रक्रिया वेगाने पुढे सरकण्याची आशा आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व विभागीय आयुक्तांना अहवाल दिल्यानंतर महसूल विभाग जाहिरात प्रसिद्ध करेल. १७०० तलाठी पदांची भरती एमपीएससीकडून होणार असून यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणी पत्र मागवण्यात आले आहे.

तलाठी भरतीसंदर्भातील शासन निर्णयात काय म्हटले आहे?


महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारीत आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावयाची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता बिंदू नामावली मागास वर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरीता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास दि.०८.०५.२०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे, ही विनंती केली आहे.