सरकारचा अजब निर्णय! ३० रुपयांना मिळणारा वाटाणा १३० रुपये किलोने खरेदी

Pune News प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेत(शालेय पोषण आहार) कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असून ३० रुपयांना मिळणारा वाटाणा तब्बल १३० रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला आहे. या योजनेवर १८० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्यात अनेकांनी कोट्यावधी रुपयांची मलई खाल्याचा आरोप मंगळवारी विधानसभेत विरोधी पक्षांनी केला.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही यात काहीप्रमाणात अनियमितता झाल्याचे मान्य करीत सचिवामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.

कैलास पाटील यांच्यासह नितीन राऊत, रमेश बोरनाळे आदींनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेच्या माध्यातून राज्यातील ८६ हजार अनुदानीत शाळांमध्ये एक कोटी तीन लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांंना केंद्र सरकार मार्फत पोषण आहार दिला जातो. या योजनेवर केंद्राकडून १८०० कोटी रुपये खर्च केले जातात. यासाठी राज्यस्तरावर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक घटकाचे तपशील आणि दर देताना हिरवा वाटाणा पुरवठा करण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार ठेकेदाराला १३४ रुपये दराना हिरवा वाटाणा पुरवठा करण्याचे काम देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात याबाबतचे कार्यादेश देताना केवळ वाटाणा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यातून ठेकेदाराने ३० रुपये किलो दराने मिळणारा पांढरा वाटाण्याचा पुरवठा केला. अशाचप्रकारे अन्य धान्य पुरवठ्यातही घोटाळा करण्यात आला असून यातून सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला.

याबाबत आपण शिक्षण मंत्र्याकडे तक्रार करुनही कारवाई झालेली नसल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यावर या प्रकरणात काहीशी अनियमिता झाल्याची कबुली देताना विभागाच्या सचिवामार्फत चौकशी केली जाईल. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही शिक्षणमंत्र्यांनी दिली.