Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचे,’ती मी नव्हेच!’

Pune update राजकारणात अधूनमधून वादळं उठत असतात, काही दिवस गाजतात आणि मग शांत होतात. पण काही प्रकरणं अशी असतात की, ती संपूर्ण व्यवस्थेलाच हादरवून टाकतात. भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणार्‍या अशोक खरात प्रकरणाने नेमकं हेच केलं आहे.

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या खुलाशांनी अनेक राजकीय नावे समोर आणली आणि त्यात रुपाली चाकणकर यांचे नाव विशेषत: चर्चेत आले. या सगळ्या घडामोडीत चाकणकर यांची भूमिका ‘ती मी नव्हेच’ अशीच राहिलेली दिसते. पण हा नुसता नकार पुरेसा आहे का, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने विचारला जात आहे. दमानिया यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले आकडे आणि तपशील हे केवळ आरोप म्हणून दुर्लक्षित करता येतील का? एखाद्या व्यक्तीने 177 वेळा फोन करणं, एका दिवशी 22 मिनिटांचं संभाषण होणं हे सगळं केवळ योगायोग म्हणता येईल का? सामान्य नागरिकाच्या दृष्टीने हे आकडे धक्कादायक आहेत. राजकारणात असलेल्या व्यक्तींनी अशा संशयास्पद व्यक्तींशी संपर्क ठेवला, तर त्यामागचा उद्देश काय असू शकतो, हा प्रश्न नैसर्गिक आहे. चाकणकर यांचा दावा आहे की, हे आरोप बेछूट, कपोलकल्पित आणि बदनामी करण्यासाठी आहेत. पण मग त्या आरोपांना ठोसपणे खोडून काढण्यासाठी त्यांनी पुढे येऊन स्पष्ट भूमिका का घेतलेली दिसत नाही?

या प्रकरणात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे चाकणकर यांची दीर्घकाळची शांतता. आरोप झाले, चर्चा रंगली, माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या. पण त्या सुरुवातीला फारशा पुढे आल्या नाहीत. एक-दोन निवेदने, सोशल मीडियावर पोस्ट आणि आरोपांचे खंडन इतक्यावरच त्या थांबल्या. जर एखाद्या व्यक्तीवर गंभीर आरोप झाले असतील आणि ते खोटे असतील, तर त्या व्यक्तीने आक्रमकपणे समोर येऊन सत्य मांडणं अपेक्षित असतं. पण येथे उलट चित्र दिसतं. ही शांतता संशय अधिक गडद करते. चाकणकर यांची भूमिका ‘आमचा काही संबंध नाही’ अशी आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात किंवा इतर कोणत्याही दुष्कृत्यात त्यांचा सहभाग नाही. हे विधान ठाम आहे, पण त्याला पूरक अशी पारदर्शकता मात्र दिसत नाही. जर खरंच काहीच संबंध नसेल, तर इतक्या मोठ्या प्रमाणावर फोन कॉल्स का झाले? इथेच चाकणकर यांची भूमिका दुटप्पी वाटू लागते. एका बाजूला त्या स्वत:ला पूर्णपणे निर्दोष ठरवतात, तर दुसर्‍या बाजूला त्या तपास प्रक्रियेपासून काहीशा दूर राहिल्यासारख्या दिसतात. जर त्या निर्दोष असतील, तर एसआयटीच्या चौकशीला सामोरे जाणं त्यांच्यासाठी संधीच ठरू शकते. स्वतःचं नाव स्वच्छ करण्याची संधी. मग त्या पुढाकार का घेत नाहीत? ‘मला चौकशीसाठी बोलवा, मी सर्व माहिती देईन’ असं ठामपणे का म्हणत नाहीत? याउलट, त्यांच्या कुटुंबियांची चौकशी झाल्याची दिसते. त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची आठ तास चौकशी झाली. ही चौकशी अनेक प्रश्न निर्माण करते. जर या प्रकरणाशी काहीही संबंध नसेल, तर कुटुंबीयांचा तपासात समावेश का झाला? आणि चौकशीनंतर केवळ आरोप फेटाळून लावणं हे पुरेसं उत्तर ठरू शकतं का? राजकारणात आरोप-प्रत्यारोप नवीन नाहीत. पण प्रत्येक वेळी एक गोष्ट अपेक्षित असते ती म्हणजे उत्तरदायित्व. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी केवळ आरोप नाकारून चालत नाही; त्यांनी पारदर्शकतेने वागणं आवश्यक असतं. विशेषत: जेव्हा प्रकरण एका भोंदूबाबाशी संबंधित असतं आणि त्यातून समाजात चुकीचे संदेश जाऊ शकतात.

तब्बल एक महिना उलटून गेला, तरीही चाकणकर यांना अधिकृत चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. त्यांना एक समन्स पाठवला होता, पण आपण दूर आहोत, महिला आहोत, अशी कारणे देऊन उपस्थित राहणे टाळले. हा मुद्दा दोन बाजूंनी पाहायला हवा. एक म्हणजे तपास यंत्रणांनी आपलं काम वेगाने करायला हवं. दुसरं म्हणजे, एखाद्या व्यक्तीने स्वत:हून पुढे येऊन तपासात सहकार्य करणं हे अधिक विश्वासार्ह ठरतं. चाकणकर यांनी हा मार्ग का स्वीकारलेला नाही? त्यांच्या भूमिकेत एक प्रकारचा विरोधाभास दिसतो. त्या म्हणतात की, त्यांच्यावर अन्यायकारक आरोप होत आहेत, पण त्याच वेळी त्या आरोपांना ठोस पुराव्यांनी प्रत्युत्तर देण्याऐवजी भावनिक भूमिका घेतात.’सत्य प्रखरतेने समोर येईल’ हा विश्वास व्यक्त करणं सोपं आहे, पण त्या सत्याला समोर आणण्यासाठी सक्रिय प्रयत्न करणं अधिक महत्त्वाचं असतं. राजकारणात विश्वास हे सर्वात मोठे भांडवल असते. तो एकदा डळमळीत झाला की पुन्हा उभा करणं कठीण होतं. चाकणकर यांच्या बाबतीत नेमकं हेच घडतंय. त्यांची प्रतिमा, त्यांची विश्वासार्हता हे सगळं या प्रकरणामुळे धोक्यात आलं आहे. अशोक खरातसारख्या व्यक्तीशी इतक्या वेळा संपर्क का झाला, याचं स्पष्ट आणि ठोस उत्तर मिळाल्याशिवाय ही चर्चा शांत होणार नाही. हा केवळ राजकीय वाद नाही, हा नैतिकतेचा प्रश्न आहे. सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींनी कोणाशी संबंध ठेवावेत, किती ठेवावेत, आणि का ठेवावेत याचं भान ठेवणं आवश्यक आहे. शेवटी, ‘ती मी नव्हेच’ ही भूमिका कितीही वेळा मांडली, तरी ती लोकांना पटण्यासाठी केवळ शब्द पुरेसे नसतात. त्यासाठी कृती, पारदर्शकता आणि तपासाला पूर्ण सहकार्य आवश्यक असतं.