Pune सिंहगड रोडवरील नऊ बेकायदा रेडीमिक्स सिमेंट (आरएमसी) प्लांटवर शुक्रवारी होणारी कारवाई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती फोडल्यामुळे थांबली. यामुळे प्रशासकीय वर्तुळात अस्वस्थता पसरली असून, तो ‘फुटीर’ अधिकारी कोण, याचा शोध आता सुरू झाला आहे.
धूळ निर्माण होऊ नये, यासाठी आरएमसी प्लांटचालक नियमांचे पालन करत नाहीत. प्लांटभोवती उंच पत्रे लावणे, झाडे लावणे, पाण्याचा मारा करणे, वाहनांची चाके धुणे, डंपरमधील खडी, सिमेंटमुळे धूळ उडू नये, म्हणून वर कापड टाकणे अशा उपाययोजना करणे अनिवार्य आहे. नियमांचे पालन होत नसल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘गुदमरतोय श्वास’ या मालिकेतून ‘सकाळ’ने हा प्रकार चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर बेकायदा आरएमसी प्लांटवर कारवाई सुरू झाली.
बांधकाम विभागाने धायरी, वडगावमधील प्लांटवर कारवाई करण्याचा प्रस्ताव अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिला. त्यानुसार शुक्रवारी (ता. १७) पहाटे कारवाई करण्याचे नियोजन तयार केले. ही फाईल विविध अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवली जात असताना एका अधिकाऱ्याने याची टीप प्लांट चालकांना दिली. त्यानंतर कारवाई थांबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हालली. अवघ्या काही मिनिटांत अतिक्रमण निर्मूलन विभागाला कारवाई करू नका, असा आदेश देण्यात आला.
त्यामुळे ‘फुटीर’ अधिकारी कोण? याचा शोध सुरू झाला आहे. बेकायदा आरएमसी प्लांटची यादी बांधकाम विभागाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे पाठवली आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी ठोस पाऊल उचलण्यावरून बांधकाम विभाग गोंधळात पडला आहे. त्यातच अतिक्रमण विभागाने आयुक्तांच्या आदेशानुसार लोहगावात कारवाई केल्यानंतर बांधकाम विभागाने वडगाव व धायरीतील प्लांटची यादी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठवून कारवाई करण्यास सांगितले होते.
“वडगाव, धायरीतील आरएमसी प्लांटवर कारवाईचे नियोजन सुरू असताना मला अचानक कारवाई करू नये असे आदेश आले. त्यामुळे कारवाई रद्द केली.”
– सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग
“लोहगावात कारवाई करण्याचे आदेश मी दिले होते. मात्र, वडगाव, धायरीत होणाऱ्या कारवाईबाबत मला माहिती नव्हती. कारवाई का रद्द झाली, याची माहिती घेतली जाईल. प्लांट बेकायदा असतील तर त्यावर कारवाई होणार.”
– नवलकिशोर राम, आयुक्त
