रोहित पवारांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळही पंढरपुरात उपोषणाला बसणार

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे उपोषण सुरू केले.

राज्य सरकारने जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ सुरूच राहील, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. त्यांच्या या उपोषणाला आता काँग्रेसनेही जाहीर पाठिंबा दर्शवला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हेदेखील पंढरपुरात जाऊन उपोषणाला बसणार आहे. खुद्द सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या संदर्भातील घोषणा केली आहे.

भाजपा आणि महायुती सरकारवर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करून सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरु केलेल्या उपोषणाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत, त्या सरकारने तात्काळ मान्य करायला हव्यात. रोहित पवार यांच्या उपोषणस्थळी जाऊन मी सुद्धा उपोषण करणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ हेदेखील उपस्थित होते.