Pune News राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध छुप्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे.
राज्यातील गुटखा माफियांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आता थेट ‘मकोका’ (MCOCA – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
आतापर्यंत गुटख्याच्या कारवाईत केवळ लहान-मोठे पानटपरी चालक किंवा किरकोळ विक्रेते अडकले जात होत तर मुख्य सूत्रधार पडद्यामागून सूत्रे हलवत असत. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे चित्र बदलण्याचे आदेश दिले आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार हा आता संघटित गुन्हा मानला जाणार असल्याने या साखळीतील प्रत्येक घटकावर संक्रांत येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्पादक , मुख्य पुरवठादार, वाहतूकदार, मोठे घाऊक विक्रेते गोदाम चालक संपूर्ण नेटवर्कच आता मुंढे यांच्या रडारवर आहे.
