Pune news स्वारगेट-कात्रज या 5 किमी मेट्रो मार्गिकेवर पूर्वी मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज अशी तीन स्थानके निश्चित करण्यात आली होती. मात्र, स्थानकांच्या यादीत बालाजीनगरचा समावेश व्हावा, अशी सातत्याने मागणी होत होती.
अखेर ही मागणी मान्य करत मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या टप्पा-1 अंतर्गत स्वारगेट-कात्रज मार्गावर बिबवेवाडी आणि बालाजीनगर या दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटद्वारे दिली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात पुणे मेट्रो मार्गावरील दोन नवीन स्थानकांना मंजुरी मिळाल्याने पुणेकरांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले.
याशिवाय पुणे-लोणावळा या उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याला देखील बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे औद्योगिक, निवासी आणि व्यावसायिक विकासाला नवी गती मिळेल, तसेच वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
