दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Pune News राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीअखेर घेतल्या जाणार असून राज्य निवडणूक आयोगाने तसे नियोजन केले आहे.

दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पहिला टप्पा जिल्हा परिषदा व पंचायत समित्या किंवा नगरपालिका-नगरपरिषदांचा असणार आहे. दिवाळीत या निवडणुकांचा बिगुल वाजेल, अशी माहिती निवडणूक आयोगातील विश्वनिय सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. सध्या नगरपालिका- नगरपरिषदांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानंतर आरक्षण काढले जाईल. दरम्यान, जिल्हा परिषदांच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे.

दरम्यान, महापालिकांच्या वॉर्डरचनेचा विषय अजूनही प्रलंबितच असल्याने या निवडणुका डिसेंबर-जानेवारीत होतील, असे नियोजन आहे. दिवाळीत पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. निवडणुकीसाठी उपलब्ध मनुष्यबळ, ईव्हीएम या बाबींचा अंदाज घेऊन निवडणुकींचा कार्यक्रम तयार केला जाईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यभरात नऊ कोटी ८० लाख मतदार आहेत. या निवडणुकांच्या निकालावरून राज्यातील राजकीय पक्षांचे भविष्य ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच

नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच होणार आहे. नगराध्यक्षांच्या आरक्षणाची सोडत सरकारच्या वतीने काढली जाणार आहे. राज्यात २०१९ नंतर सत्ता बदल झाल्यावर नगराध्यक्षांची निवड बहुमताने केली जात होती. आता त्यात पुन्हा बदल करण्यात आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे नगराध्यक्ष जनतेतूनच निवडले जातील, हे निश्चित झाले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अशा…

  • जिल्हा परिषदा
  • ३२
  • पंचायत समित्या
  • ३३१
  • महापालिका
  • २९
  • नगरपालिका-नगरपरिषदा
  • २८९

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीअखेर संपतील

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या, आरक्षण निश्चिती झाल्यानंतर राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसमवेत बैठक होईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.

– सुरेश काकाणी, सचिव, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग