Pune zp junior college : पुणे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा सुरू करणार – भाजपचे गटनेते शिवाजी बुचडे!

झेडपीच्या शिक्षण समितीच्या बैठकीत उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांची सहमती : पाठपुराव्याला यश आल्याची भावना

पुणे, दि. ३ जून २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या मोठ्या शाळांत इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यास उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे-पाटील यांनी सहमती दर्शवली असून याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे. यानुसार आता जिल्हा परिषदेच्या मोठ्या माध्यमिक शाळांचे उच्च माध्यमिक शाळांमध्ये (कनिष्ठ महाविद्यालय) रुपांतर होणार असल्याचे जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शिवाजी बुचडे यांनी सांगितले. यामुळे मागील दोन महिन्यांपासून करत असलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची भावना बुचडे यांनी व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यातील मोठ्या शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. याच धर्तीवर जिल्ह्यातील दुर्गम भागातील मोठ्या शाळांमध्ये इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी शिवाजी बुचडे यांनी जिल्हा परिषदेवर निवडून आल्यापासून सुरू केली आहे. मुळशी तालुक्यातील हिंजवडी जिल्हा परिषद गटातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी पौड येथे यावे लागते. मात्र दुर्गम भागातून एवढ्या लांब जाणे-येणे शक्य होत नाही. त्यामुळे या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे बुचडे यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक मंगळवारी (दि.२ जून) झाली. या बैठकीतही बुचडे यांनी ही मागणी केली. त्यावेळी उपाध्यक्ष आणि शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे-पाटील यांनी यासाठी सहमती दर्शविली. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे आदी उपस्थित होते.

शिक्षण समितीच्या बैठकीत बुचडे यांनी केलेल्या मागण्या

  • जिल्हा परिषदेच्या मोठ्या शाळांमध्ये ‘नीट’ आणि ‘जेईई’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक यंत्रणा उभी करा.
  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात यावे.
  • बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार (आरटीई) मोफत प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी प्राप्त सर्व अर्जांची सखोल छाननी करावी.
  • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक केंद्र शाळेत कला, क्रीडा आणि विशेष शिक्षकांची नियुक्ती करावी.
  • झेडपीच्या मोठ्या शाळांमध्ये समुपदेशन केंद्रे (Counciling centres) सुरू करावेत.