मुळशीतील भालगुडी-लव्हाळवाडीत भीषण आग; तात्काळ पंचनामे करण्याचे सभापती मंदाताई शेळके यांचे प्रशासनाला आदेश

मुळशी प्रतिनिधी – : पौड – मुळशी तालुक्यातील मौजे भालगुडी येथील लव्हाळवाडी परिसरात बुधवारी भीषण आग लागून सुमारे आठ घरे जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग वेगाने पसरल्याने काही वेळातच अनेक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी गेली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.

घटनास्थळी मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई शेळके यांनी त्वरित भेट देऊन प्रशासनाशी संपर्क साधत पंचनामेचे आदेश दिले प्रशासनाने देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्वरित पंचनामे देखील सुरू केले यावेळी आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमोद बलकवडे, तहसीलदार विजयकुमार चोबे, पंचायत समिती सदस्य प्रवीण धनवे, तलाठी, कोतवाल तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल भामे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.