कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने..; काँग्रेसची पार्थ पवारांवर जोरदार टीका

Pune बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी एकूण ५५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी “महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे” अशा शब्दात जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता काँग्रेसकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पार्थ पवार यांना ‘धड भाषणही देता न येणारे’, ‘कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर नुकतेच खासदार झालेले’ आणि ‘कृतघ्न मुलगा’ अशा कडवट शब्दांमध्ये जोरदार हल्ला केला आहे.

काँग्रेसने नेमकं काय म्हटलं आहे?

आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. “स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात एफआयआर नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे?” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

पार्थ पवार काय म्हणाले होते?

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर खासदार पार्थ पवार म्हणाले की, “काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलण्याची मला गरज वाटत नाही. कारण सर्वांना माहित आहे की, ते काय करत आहेत? सर्व लोक मोठे आहेत, त्यांना काय चाललंय हे समजतं. त्यांनी जो विचार केला असेल तो त्यांना करू द्या. पण काँग्रेसला नंतर महाराष्ट्रात काय त्रास होणार हे त्यांना दिसेल. कारण अजितदादा यांच्याबाबत लोकांच्या मनात प्रेम आहे. अशा वेळी एवढ्या मोठ्या पक्षाने असा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं आहे. आपण कोणाला थांबवू शकत नाहीत. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागत असतं. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. जे काय नशिबात असेल ते होईल. पण मला याचं वाईट वाटतं की महाराष्ट्रात सध्या काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे.”