Pune राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धक्कादायक निर्णय घेतले आहेत. आता आज सकाळीच ‘देवगिरी’ बंगल्यावर एक बैठक झाली, या बैठकीत आमदार इद्रिस नायकवडी यांना आमदारकीचा राजीनामा मागितल्याचे समोर आले आहे.
या बैठकीत पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित होते, याआधीही नायकवडी यांच्याकडे राजीनामा मागितला होता. आता पुन्हा एकदा राजीनामा मागितल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘देवगिरी’ बंगल्यावर पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवा नेते पार्थ पवार आणि स्वतः आमदार इद्रीस नाईकवाडी उपस्थित होते. या बैठकीत वरिष्ठांनी नाईकवाडी यांना “तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्या, पक्ष भविष्यात तुम्हाला यापेक्षा मोठी आणि चांगली संधी देईल,” असे आश्वासन देत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नायकवडी यांनी याला स्पष्ट नकार दिल्याचे समजते.
इद्रिस नायकवडी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर आमदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नायकवडी यांनी राजीनामा दिल्यास त्यांच्या जागी दुसऱ्या एका नवीन आणि तरुण चेहऱ्याला आमदारकीची संधी देण्यासाठी युवा नेते पार्थ पवार हे आग्रही आहेत आणि त्या दृष्टीनेच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
अजितदादांनी दिली होती आमदारकी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील एक महत्त्वाचा आणि विश्वासू अल्पसंख्यांक चेहरा म्हणून इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी दिली होती. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर आता पक्षातील नवीन नेतृत्वाकडून नायकवडी यांना बाजूला सारण्याचे प्रयत्न होत असल्याचा सूर राजकीय वर्तुळातून उमटत आहे.
या संपूर्ण नाट्यमय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.
