Pune news: ‘पाया पडते लवकर घेऊन चला’, जखमी तरुणीची आर्त हाक, सिंहगड फिरायला गेलेल्या तरुण-तरुणीचा भीषण अपघात

सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. सिंहगड किल्ल्यावरून दुचाकीवरून खाली येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट खोल दरीत कोसळली.

या भीषण अपघातात एक तरुण आणि तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. पूजा चव्हाण आणि सौरव पासलकर अशी जखमी झालेल्या दोघांची नावं आहेत.

नियंत्रण सुटले अन् दुचाकी दरीत कोसळली
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण-तरुणी सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते. काल संध्याकाळच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून किल्ल्यावरून खाली उतरत होते. सिंहगड घाटातील ‘११ हजार पॉईंट’ परिसरात आले असता, चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट खोल दरीत जाऊन कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की दोघेही दरीमध्ये बरेच खाली फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच वनविभाग, वन समितीचे कर्मचारी, स्थानिक नागरिक, इतर पर्यटक आणि आपत्ती व्यवस्थापन टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरी खोल आणि उतरण अवघड असल्याने जखमींना बाहेर काढणे मोठे आव्हानात्मक होते. मात्र, सर्वांनी अथक प्रयत्न करून अत्यंत काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशन राबवले आणि दोन्ही जखमींना दरीतून सुखरूप बाहेर काढलं.

तरुणाच्या डोक्याला तर तरुणीच्या पायाला गंभीर दुखापत
या अपघातात दोन्ही पर्यटकांना गंभीर दुखापत झाली आहे. तरुणीच्या पायाला जबर मार लागला असून, प्राथमिक तपासणीत तिचा पाय २ ते ३ ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं आहे. तरुणीला जागेवर बसताही येत नव्हतं. ती वेदनेनं विव्हळत होती. ‘पाया पडते मला लवकर घेऊन चला’, अशा शब्दात ती मदत याचना करत होती. तर तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरीतून बाहेर काढल्यानंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.