Eknath Shinde: बंडू जाधव तू आयुष्यातील सर्वात मोठी चूक केलेय, तुझ्या राजकारणाला अवकळा लागली समज;

Pune एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांचा दबाव झुगारुन परभणीतील नियोजित शेतकरी मेळावा रद्द करायला नकार दिल्यानंतर जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) चांगलेच संतापले आहेत.

बंडू जाधव याने संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं ऐकून आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. इथून तुझ्या राजकारणाला अवकळा लागली समज, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते रविवारी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

मनोज जरांगे पाटील यांनी बंडू जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज परभणी येथे होऊ घातलेला शेतकरी मेळावा रद्द करण्यास सांगितले होते. मात्र, बंडू जाधव यांनी हा कार्यक्रम होणारच, असे सांगितल्यानंतर मनोज जरांगे पाटील प्रचंड संतापले. बंडू जाधव याने आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे, संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदेंचं ऐकून. बंडू जाधवचं अस्तित्त्व मराठ्यांनी उभं केलंय, हे तो विसरला. त्याला सांगितलं होतं कार्यक्रम रद्द कर, त्याने केला नाही, ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. कार्यक्रम घेणं अस्तित्व नव्हतं तुझं, मराठा समाजाला सांभाळणं हे तुझं अस्तित्वं होतं. पण आता तुझ्या राजकारणाला आता अवकळा लागली समज, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

बंडू जाधव हा सगळ्यात थर्डक्लास माणूस निघाला. तुझ्याकडे 500 गुंड असतील, पण त्यावर राजकारण चालत नाही. तुझे हे असले गुंड आम्ही रोज कोलतो. तुझ्यामुळे एकनाथ शिंदे आणखी खोलात गेला आहे, हे लक्षात ठेव. बंडू जाधव तू शिरसाटाचं ऐकून शेतकऱ्यांच्या आडून मराठ्यांच्या उरावर नाचला आहे. आता याची परतफेड होणार. 12 ला आमची तारीख जाहीर होणार. एकनाथ शिंदेंनी आव्हान दिलं, ते मी स्वीकारतो, आम्ही त्याची मुंबईत परतफेड करतो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

संजय शिरसाटने प्रमाणपत्र रद्द केले, बंडू जाधवला वाटत असेल मी दादा आहे. पण दादा आणि वादा काय नाय, असे उडत गेलेत लय. आम्ही आजपर्यंत प्रेम केलंय तुझ्यावर. तुझ्यासाठी जीवाचं रान केलं, तुझी बाजी नव्हती, तेव्हा पलटीच मारायला लावली आणि तू आज मराठ्यांच्या उरावर नाचतो का? अजिबात कार्यक्रम घ्यायचा नाही मतदारसंघात. शिरसाट आणि तू षडयंत्र रचलंय. बंडू जाधव तुमच्यामुळे राज्यात वातावरण खराब होईल. एकनाथ शिंदेंना कार्यक्रम झाल्यावर परत नांदेडला जायचंय. तुझ्यामुळे एकनाथ शिंदेंना इकडेच राहायची वेळ येईल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते.