Pune Update – ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत पाच मिनिटांत २३२ विषय कोणत्याही चर्चेविना मनमानीपणे मंजूर करणे म्हणजे ठाणेकरांच्या पैशांवर टाकलेला दरोडाच असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला आहे.
सत्ताधारी शिंदे गटाचा राडा टक्केवारीच्या वादातून झाला असून शिंदे गट व भाजप यांच्या महायुतीचा बुरखा टराटरा फाटला आहे असे सांगत महासभेचे कामकाज यापुढे लाईव्ह करावे अशी जोरदार मागणी दिघे यांनी केली आहे.
आज झालेल्या महासभेत शिंदे गटाविरोधात भाजपचे जोरदार रणकंदन झाल्यानंतर केदार दिघे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सत्ताधाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला. त्यात म्हटले आहे की, आज झालेली महासभा म्हणजे लोकशाहीचा निव्वळ फार्स असून सर्वसामान्य जनतेला सभागृहातून काय चालते हे कळावे यासाठी संपूर्ण कामकाज लाईव्ह करणे अत्यंत गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांमध्येच झालेला हा गोंधळ अतिशय संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हा तर ठाणेकरांचा अपमान
लोकशाहीच्या मंदिरात लोकप्रतिनिधींना बोलूच न देणे हा ठाणेकरांचा अपमान आहे. महासभेत आज गट व हा विकासाचा नव्हे तर टक्केवारीचा आहे. महायुतीचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. हा वाद ठाणेकरांच्या पाण्यासाठी किंवा खड्डे बुजवण्यासाठी नव्हता तर कंत्राटांमधील मलई व टक्केवारीवरून होता असा आरोपही केदार दिघे यांनी केला आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार ही शरमेची बाब
स्वतःला देशभक्त म्हणवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी अंतर्गत वादामध्ये राष्ट्रगीताचा अवमान केला. विशेष म्हणजे भाजपला त्यांच्याच मित्र पक्षाविरोधात पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली ही ठाणेकरांसाठी शरमेची बाब असल्याचेही केदार दिघे यांनी म्हटले आहे.
