पुण्यातील बाणेर भागात महापालिकेचे कर्करोग रुग्णालय! ‘या’ दरात होणार उपचार, हॉस्पिटलची वैशिष्ट्ये!

Pune update कर्करोगाच्या रुग्णांची वाढत असलेली संख्या आणि त्यावर उपचारांसाठी होणारा खर्च पाहता. कर्करोगाच्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटूंबाला दिलासा देण्यासाठी महापालिकेने आपुलकी मेडिकल केअर सेंटर यांच्या वतीने रुग्णालय सुरू केले असून, या रुग्णालयाचे लोकार्पण उद्या (रविवारी) १७ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

सार्वजनिक खासगी भागीदारी’ (पीपीपी) पद्धतीने हे रुग्णालय उभारण्यात आले आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. सुमारे १५० खाटांचे हे रुग्णालय असून यामध्ये विविध प्रकारच्या कर्करोगांवर उपचार केले जाणार आहेत. तसेच हृदयविकारांवर उपचार होणार आहेत. शासकिय दरात येथे उपचार मिळणार असून यामुळे शहरातील कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

बाणेर परिसरात महापालिकेची एक एकर जागा होती. या जागेवर हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. हा सुमारे १६५ कोटी रुपयांचा प्रकल्प असून, महापालिकेने १४ कोटी रुपयांची जमीन अद्यावत रुग्णालय उभारण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. उर्वरित संपूर्ण खर्च संबधित संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. या अद्यावत रुग्णालयासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक, व्यवस्थापन तसेच कर्मचारी यांच्या खर्चाची जबाबदारी आपुलकी मेडिकल केअर सेंटर पार पाडणार आहे. पीपीपी तत्त्वावर उभारलेले असे हे देशातील पहिलेच कर्करोग रुग्णालय आहे.

या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांकडून शासकीय दराने (सीजीएचएस) शुल्क घेतले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर्करोगाचे उपचार घेणे सोपे होणार आहे. कर्करोगाच्या निदानापासून उपचार तसेच शस्त्रक्रिया अशी सुविधा येथे मिळणार आहे. आवश्यक त्या सेवा सुविधा एका छताखाली मिळणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले. यावेळी स्थानिक नगरसेविका मयुरी कोकाटे, माजी नगरसेविका ज्योतीताई कळमकर, महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोऱ्हाडे, उपआरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

रुग्णालयात ३५ कोटींची ‘ लिनियर ॲक्सेलेरेटर ‘ मशीन

सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने पीपीपी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या या रुग्णालयामध्ये कर्करोगाच्या पेशींवर अचूक उपचार करण्यासाठी अत्याधुनिक ‘लिनियर अॅक्सेलेरेटर’ मशीन बसविण्यात आले आहे. ३५ कोटी रुपये किमतीची ही मशीन पुण्यातील केवळ काही मोजक्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. याबरोबरच पेट स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी, अत्याधुनिक शस्त्रक्रिया थिएटर आणि जनरल हॉस्पिटल अशा सुविधाही येथे उपलब्ध असतील.

आरोग्य क्षेत्रातील महापालिकेचे मोठे पाऊल

या प्रकल्पाला पुणे महापालिकेच्या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. विशेषत: पुणे मनपा क्षेत्रातील रुग्णांना उपचारात प्राधान्य दिले जाणार असून, वेळ आणि खर्च दोन्हीमध्ये मोठी बचत होणार आहे. पुण्यातील आरोग्य सुविधांच्या इतिहासात हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या वेळी व्यक्त केला.

४५ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कायम सेवेत

या रुग्णालयात सध्या ४० ते ३५ तज्ज्ञ डॉक्टर तसेच ४०० कर्मचारी सेवा पुरविणार आहेत. २४ तास ही सेवा दिली जाणार आहे. कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना विविध ठिकाणी फिरावे लागू नये म्हणून सर्व तपासण्या आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. प्रितेश मुनोत यांनी सांगितले.