Pune पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत व्यापारी बँकांच्या एनपीए खात्यांबाबत गावात प्रसिद्ध झालेल्या यादीतील थकबाकी आणि पोर्टलवरील थकबाकीमध्ये फरक आढळल्यास पोर्टलवरील रक्कम अंतिम मानली जाईल.
आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या पावतीवर कर्जमुक्तीची रक्कम दिसेल आणि ती संबंधित शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.
जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, त्यापैकी १ लाख ३२ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत.
उर्वरित पात्र शेतकऱ्यांची माहिती अद्याप बँकांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेली नसून, पोर्टलद्वारे त्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे. दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँक शाखा आणि सेवा संस्थांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना संबंधित बँकांकडून खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कर्जमाफीच्या रकमेबाबत काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी ती पोर्टलवर ऑनलाइन नोंदवावी. या तक्रारींचा निपटारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत केला जाईल. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
