Aadhar Verification: पुणे जिल्ह्यात ५० हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्णत्वाला

Pune पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यातील ६४ हजार ६५५ पात्र लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ५० हजार ४४८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

उर्वरित १४ हजार २०७ लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित असून, त्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय प्रमाणीकरणात दौंड आघाडीवर असून, तेथे १० हजार ६४३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यापाठोपाठ इंदापूरमध्ये नऊ हजार २३१, बारामतीत आठ हजार ५७८ आणि शिरूरमध्ये चार हजार ७२९ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे.

पुरंदरमध्ये तीन हजार १४३, भोरमध्ये दोन हजार ३०८, खेडमध्ये दोन हजार २०८, जुन्नरमध्ये दोन हजार १५५, मावळमध्ये एक हजार ३५२, हवेली व आंबेगावमध्ये प्रत्येकी एक हजार ३५१, मुळशीत ५७३ आणि वेल्ह्यात ४२९ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले

राष्ट्रीयीकृत व इतर बँकांमधील लाभार्थ्यांपैकी दोन हजार ३९७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, एक हजार ८४७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधून प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.