Pune News पुण्यात दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर गणिताच्या दोन प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ग्रुप अॅडमीन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परीक्षेपूर्वीच गणित ‘एक’ आणि ‘दोन’ हे दोन्ही पेपर एका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित झाले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणिताच्या प्रश्नपत्रिका परीक्षा होण्याच्या काही दिवस आधीच एका मेसेजिंग ग्रुपवर फिरत असल्याचे समोर आले. काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका शेअर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित माहिती शिक्षण मंडळ आणि पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान ६ मार्च रोजी झालेल्या ‘गणित भाग-१’च्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र ५ मार्च रोजी रात्री ८ वाजून ३७ मिनिटांनी त्या ग्रुपवर टाकण्यात आल्याचे दिसून आले. तसेच, ९ मार्च रोजी झालेल्या ‘गणित भाग-२’च्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र ६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजून ५६ मिनिटांनी म्हणजे तीन दिवस आधीच ग्रुपवर उपलब्ध असल्याचे आढळून आले.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून आणि कशा प्रकारे बाहेर पडली, तसेच ती सोशल मीडियावर कोणी आणि कशासाठी प्रसारित केली याचा शोध घेतला जात आहे. सायबर तज्ञांचीही मदत घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आवश्यक असल्यास संबंधित पेपर पुन्हा घेण्याबाबत शिक्षण मंडळ निर्णय घेऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.
