पुणे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात जवळीक वाढली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. बंद दाराआड विविध विषयांवर त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दोन वेळा अमित शाहांशी भेट घेतली होती. मागच्या 25 दिवसांत शरद पवार गटाचे नेते आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांच्यातील भेटीगाठी वाढल्याने शरद पवार गट एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता सोमवारी पुन्हा एकदा सुप्रिया सुळे आपल्या पक्षाच्या ८ खासदारांसह मोदींची भेट घेणार आहेत.
या भेटीवरून आता विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून लवकरच महाराष्ट्रात भूकंप होईल, असं बोललं जातंय. मात्र सुप्रिया सुळे यांनी वेगळाच दावा केला आहे. आम्ही लपून छपून भेट घेत नाहीये, आम्ही उघडपणे भेट घेणार आहोत, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय. तसेच राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर ही भेट असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. असं असलं तरी पडद्याआड काहीतरी शिजत असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळाकडून व्यक्त केला जात आहे.
डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा मुद्दा?
जरी सुप्रिया सुळे यांनी ही भेट लोककल्याणाच्या आणि राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांसाठी असल्याचे म्हटले असले, तरी राजकीय वर्तुळात मात्र वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून ‘डिलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षण विधेयकाबाबत विशेष रणनीती आखली जात असून, याच पार्श्वभूमीवर भाजपच्या शीर्ष नेतृत्वाशी सुळे यांची ही भेट होत असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, गेल्या २५ दिवसांतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी सुळे यांची ही चौथी भेट ठरणार आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेवर सडकून टीका
यावेळी पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘एफसीआरए’ (FCRA) विधेयकाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, ड्रग्ज किंवा बेकायदेशीर पैशांचा प्रवाह रोखण्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे; मात्र सर्वच स्वयंसेवी संस्थांकडे संशयाने पाहणे योग्य नाही. तसेच, शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी लावून दुसरीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेद्वारे सवलती देणे हा सरकारचा केवळ निवडणुकीपुरता स्टंट असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.
