Pune: शासन देतंय १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; सरकारच्या ‘या’ योजनेसाठी पुणे विभागातील महिलांची एकच गर्दी!
पर्यटन क्षेत्रात स्वतःचे नशीब आजमावू पाहणाऱ्या आणि हक्काचा व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारची ‘आई’ पर्यटन योजना मोठा आधार ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजिकांना पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
१५ लाखांचे आर्थिक बळ; महिला बनणार ‘बॉस’
पर्यटन क्षेत्रात महिलांचे नेतृत्व वाढावे, त्यांनी केवळ नोकरी न करता स्वतःचे लघुउद्योग सुरू करून सक्षम व्हावे, यासाठी २०२३ पासून ही ‘आई’ योजना राबवली जात आहे. हॉटेल, होम- स्टे, ट्रॅव्हल एजन्सी, रिसॉर्ट किंवा पर्यटनाशी संबंधित कोणतेही स्टार्टअप सुरू करण्यासाठी महिलांना १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची मर्यादा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कर्जावरील व्याजाचा संपूर्ण बोजा सरकार उचलत असल्याने महिलांना हे कर्ज पूर्णपणे ‘बिनव्याजी’ मिळत आहे. याच सोयीमुळे पुण्याच्या महिलांनी या संधीचे सोने करण्याचे ठरवले आहे.
या योजनेअंतर्गत कर्ज सुविधेसोबतच पर्यटन विभागाकडून महिलांना ‘टूरिस्ट गाईड’ म्हणूनही विशेष व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे महिलांना पर्यटनाच्या बाजारपेठेत उतरून स्वतःचा व्यवसाय विस्तारणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे सोपे झाले आहे.
या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून आतापर्यंत एकूण ४ हजार अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी तब्बल १ हजार ७०० पेक्षा जास्त अर्ज एकट्या पुणे विभागातून आले आहेत. म्हणजेच राज्याच्या एकूण अर्जांपैकी तब्बल ४० टक्क्यांहून अधिक अर्ज फक्त पुणे विभागातील महिलांचे आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील महिलांचा समावेश आहे. पश्चिमेकडील गड-किल्ले, निसर्गरम्य पर्यटन स्थळे आणि कोल्हापूर-साताऱ्यासारखा ऐतिहासिक वारसा यामुळे या भागातील महिलांमध्ये पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याची मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.
