Pune News २५ लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना धनकवडीत घडली. रोकड हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरटा आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धनकवडी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सोमवारी (२५ मे) सकाळी साडेनऊच्या सुमारास ते धनकवडीतील टपाल कार्यालय परिसरातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला. स्प्रे फवारल्यानंतर ते गोंधळून गेले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडील पिशवी हिसकावून नेली. पिशवीत २५ लाख ९० हजारांची रोकड होती.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी धनकवडी टपाल कार्यालय ते छत्रपती संभाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
ओैंधमध्ये घरफोडी; सात लाखांचा ऐवज चोरी
सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड असा सात लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना ओैंधमधील एका सोसायटीत घडली.
या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार ज्येष्ठ महिला ओैंधमधील सिद्धार्थनगर सोसायटीत राहायला आहेत. १३ मे रोजी ज्येष्ठ महिला बाहेरगावी गेल्या होत्या. २३ मे रोजी त्या घरी परतल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाटातून दागिने आणि रोकड असा ऐवज लांबविला. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लंपास
पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील एक लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना घढली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विश्रांतवाडीतील धानोरी परिसरात राहायला आहेत. सोमवारी (२५ मे) त्यांच्या विवाहाचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त तक्रारदार आणि त्यांची पत्नी पीएमपी बसमधून देवदर्शनासाठी निघाले होते. दोघे जण मध्य भागातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. बसमध्ये गर्दी होती. बसमध्ये प्रवास करत असलेल्या चार चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन तक्रारदाराच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.
