Pune news अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेजवारी अर्ज दाखल करण्याआधी बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना बारामतीसह राज्यातील जनतेचीही काळजी घेण्याची शक्ती मला मिळावी, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.
काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
“दोन महिन्यांपूर्वी आपण आपल्या लाडक्या नेत्याला गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर मी बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, बारामतीची पोटनिवडणूक होईल. अजूनही दादा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. मला हे मान्यही नाही. पण नियतीने हा काळ माझ्यावर आणि तुमच्यावर आणला आहे. दादांच्या जाण्याने फक्त माझ्या कुटुंबाचे नव्हेतर बारामती तालुक्याचे, संपूर्ण देशाचे नुकसान झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही,” असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
तसेच “दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीमधील प्रत्येक नागरिक दादांसाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजे पांडुरंगांची सेवा हाच दादांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीच्या प्रत्येक झाडात, फुलात. पानात रस्त्यात इमारतीत दादांचा स्पर्श आहे,” असं म्हणत सुनेत्रा पवार भावुक झाल्याचं पाहायला मिळाले.
बारामतीकरांना भावुक आवाहन!
“बारामतीचकरांच्या विकासासाठ आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मांझ दुःख तळघरात कोंडलं आणि अत्यंत धिराने बाहेर पडले. मला हा धीर तुम्हा बारामतीकरांकडे बघूनच आला आहे. तुमचं प्रेम, पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे हे पहिल्यांदा मी नम्रपणे कबुल करते. गेल्या ३५३६ वर्षात तुम्ही सर्वांनी दादांना निवडून दिलं आहे. म्हणूनच दादांनी प्रत्येकवेळी त्यांच्याच मताधिक्क्याचा विक्रम मोडित काढला आहे.”
“दादांच्या नंतर ही पहिलीच निवडणूक आहे. माझ्या लग्नापूर्वीपासून मला सामाजिक कार्याचा वारसा लाभला असला तरी चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांची सून म्हणून आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांची पत्नी म्हणून गेली ४० वर्ष पवार परिवाराची काळजी घेतली आहे. आता बारामतीसह राज्यातील जनतेचीही काळजी घेण्याची शक्ती मला मिळावी,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
