प्राजक्त तनपुरेंची माघार, शरद पवारांनी शेवटच्या अर्ध्या तासात सूत्रे फिरवली

बारामतीनंतर राहुरीची पोट निवडणूकही बिनविरोध होणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार उतरवण्यात आला आहे.

माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अर्ज भरला नाही, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा राहुरीत सुरू झाली होती. पण अखेरच्या अर्ध्या तासात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुत्रे हलवली अन् स्थानिक नेते गोविंदराव मोकाटे यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे आता राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंदवार मोकाटे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. (Maharashtra bypoll updates)

राहुरी विधानसभा पोट निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गोविंदराव मोकाटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. अर्ज भरण्याच्या अर्धा तास आधी महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोविंदराव मोकाटे यांनी अर्ज दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोकाटे यांना संधी दिली आहे.

भाजपकडून अक्षय कर्डीले यांनी भरला अर्ज –

राहूरी विधानसभा पोटनिवडणुकीत स्वर्गीय शिवाजीराव कर्डीले यांचे चिरंजीव अक्षय कर्डीले यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखेंच्या उपस्थितीत भाजपा उमेदवार अक्षय कर्डीलेनी उमेदवारी अर्ज भरला. माझ्या राजकीय करियरच्या सुरवातीलाच आज स्वर्गीय शिवाजीराव कर्डीले माझ्यासोबत नाही हे माझं दुर्दैव असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. साहेब नसल्याने त्यांची जबाबदारी पार पाडत असल्याचेही अक्षय कर्डीले म्हणाले. हे सगळं करण्यात इच्छा नाही, मात्र गेल्या 35 वर्षांपासून जोडलेल्या लोकांना मी एकटं सोडणार नाही. त्यामुळे अर्ज भरत अशल्याचे कर्डीले म्हणाले.