Pune शहराच्या विविध भागांत बेकायदा सुरू असलेल्या ‘रेडी मिक्स क्राँक्रिट’ (आरएमसी) प्रकल्पांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने महापालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
लोहगाव, लोहगाव खांदवेनगर, महालक्ष्मी लॉन्स परिसरातील सात अनधिकृत आरएमसी प्रकल्प महापालिकेने जमीनदोस्त केले. महापालिकेच्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने ही कारवाई केली.
शहरातील रहिवासी भागात उभारण्यात आलेल्या आरएमसी प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतानाही महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका महापालिकेवर केली जात होती. आरएमसी प्रकल्पचालक आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात होता. लोहगाव व परिसरात मागील काही काळात औद्योगिक स्वरूपाचे अनधिकृत प्लांट आणि शेड्स मोठ्या प्रमाणावर उभारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या.
अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिले होते. त्यानुसार अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नेतृत्वाखाली लोहगाव खांदवेनगर, महालक्ष्मी लॉन्स परिसरातील ७ अनधिकृत आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करून ते पाडण्यात आले.
या कारवाई मध्ये या भागातील भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नगरसेविकेच्या पतीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला न जुमानता महापालिकेने आरएमसी प्रकल्पावर कारवाई केली. बेकायदा आरएमसी प्रकल्पावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक लोहगाव येथे आले आहे. ही माहिती समजताच या भागातील भाजपच्या नगरसेविका श्रेयस खांदवे यांचे पती प्रीतम खांदवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
महापालिकेने सुरू केलेली कारवाई थांबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कारवाई करण्यासाठी आलेले अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर त्यांची बाचाबाची झाली. प्रीतम अंगावर धावून गेल्याने महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अतिक्रमण विभागाच्या पिंजरा गाडीतून पोलीस स्टेशनला नेले. यानंतर आरएमसी प्रकल्पांवर ही कारवाई पूर्ण करण्यात आल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली..
कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ७५ जवान, १६ जेसीबी, ५ गॅसकटर, २ ब्रेकर, ३० सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि ८५ बिगारी सेवकांचा समावेश होता.
याबाबत प्रतिक्रिया देताना प्रीतम खांदवे म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकल्प बंद होता. कोणतीही नोटीस न देता मध्यरात्री दोन वाजता महापालिकेने ही कारवाई सुरू केली. मी फक्त कागदपत्रांची विचारणा केली. तेव्हा महापालिकेचे कर्मचारी माझ्या अंगावर धावून आले. मी त्यांच्या अंगावर गेलो नाही. अधिकारी, कर्मचारी अचानक समोर आल्यामुळे मी दचकलो. यावेळी त्यांच्या अंगाला धक्का लागला असावा. पण, कोणताही वाद झालेला नाही. त्यानंतर त्यांनी मला ताब्यात घेतले दोन तास पिंजरा गाडीतून फिरविले.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर म्हणाले, लोहगाव येथे कारवाई सुरू असताना प्रीतम खांदवे हे महापालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडून पोलीस स्टेशनला नेले. त्यानंतर महापालिकेने उर्वरित कारवाई पूर्ण केली.
