आधारकार्ड आणि महत्त्वाची सरकारी कागदपत्रे वाटपाऐवजी नाल्यात फेकली

Pune News नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचे असलेले आधारकार्ड मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या चकरा माराव्या लागत असताना, काही ठिकाणी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औंढा नागनाथ येथे पोस्टमनकडून आधारकार्ड व इतर महत्त्वाची कागदपत्रे वितरित करण्याऐवजी थेट नाल्यात फेकल्याचा प्रकार २६ मार्च रोजी उघडकीस आला आहे.

अनेक नागरिकांनी आधारकार्ड काढल्यानंतर ते पोस्टाने घरी येईल, या अपेक्षेने वाट पाहिली. मात्र, २६ मार्च रोजी हेडगेवार चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर आधारकार्ड, बँकांची पत्रे, नोटिसा, तसेच विविध मासिके व पुस्तके नाल्यात व रस्त्याच्या कडेला पडलेली आढळून आली. ही कागदपत्रे नागझरी, भोसी, लोहगाव आदी ग्रामीण भागातील नागरिकांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आधारकार्ड मिळत नसल्याने अनेकांचे शासकीय व बँकिंग कामे प्रलंबित राहतात. आधीच आधार केंद्रावर तासनतास उपाशीपोटी रांगेत उभे राहावे लागते, त्यानंतर असे प्रकार घडत असल्याने नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे.

२०२५ वर्षातील आधारकार्ड
याबाबत संबंधित पोस्टमनला विचारणा केली असता ही कागदपत्रे कोणी फेकली, याची माहिती नाही, असे उत्तर देण्यात आले. तसेच काही आधारकार्डवरील मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधला असता संबंधित नागरिकांनी आधारकार्ड मिळालेच नाही, अशी प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे, काही कागदपत्रांवर वर्ष २०२५ चा उल्लेख आढळल्याने ही कागदपत्रे बराच काळ प्रलंबित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे औंढा तालुक्यातील पोस्ट विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

आधारकार्ड पोस्ट ऑफिसच्या बाहेर आली कशी?
पोस्ट ऑफिसच्या कार्यालयीन भागात सामान्य नागरिकांना प्रवेश नसताना ही कागदपत्रे बाहेर कशी आली, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच सरकारी योजनांअंतर्गत पाठविण्यात आलेली मासिके व साप्ताहिकही नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याने हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे