मार्च-एप्रिल २०२६ साठी केरोसीन नियमन आदेश लागूनाशिक जिल्ह्यास २.२८ लाख लिटर केरोसीन कोटा मंजूर- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

मार्च-एप्रिल २०२६ साठी केरोसीन नियमन आदेश लागू
नाशिक जिल्ह्यास २.२८ लाख लिटर केरोसीन कोटा मंजूर
– जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक, दि. 29 मार्च 2026 (जिमाका वृत्तसेवा): केंद्र शासनाने एलपीजी गॅस पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केरोसीनचा पर्यायी इंधन म्हणून मर्यादित वापर करण्यास मान्यता दिल्यानंतर, मार्च-एप्रिल २०२६ या कालावधीसाठी नाशिक जिल्ह्यास 2 लाख 28 हजार लिटर केरोसीन नियतन मंजूर करण्यात आले आहे. या संदर्भातील सविस्तर आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले असून, जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यात उज्ज्वला योजना व इतर योजनांमुळे एलपीजी गॅस कनेक्शनचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने केरोसीन वितरणावर निर्बंध होते. मात्र, सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याने केंद्र शासनाने दिनांक १२ मार्च २०२६ रोजी राज्यासाठी 3 हजार 744 किलो लिटर (३७ लाख 44 हजार लिटर) केरोसीनचे नियतन मंजूर केले आहे. त्याअनुषंगाने नाशिक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील केरोसीन वितरणासाठी AAY व PHH शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रति कुटुंब किंवा प्रति शिधापत्रिका 3 (तीन) लिटर केरोसीन देण्यात येईल. तसेच केरोसीन विक्रीसाठी पात्र असलेल्या अन्य शिधापत्रिकाधारकांना उपलब्धतेनुसार केरोसीन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्या कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही, परंतु ग्रामपंचायतीकडून निवासी पुरावा उपलब्ध आहे, अशा कुटुंबांनाही केरोसीन मिळण्यास पात्र ठरविण्यात आले आहे.

तालुकानिहाय शिधापत्रिकाधारकांची संख्या, मागणी व उपलब्धता विचारात घेऊन केरोसीन वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये येवला, निफाड, चांदवड, बागलाण, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, नाशिक ग्रामीण, इगतपुरी, नांदगाव, सिन्नर, देवळा, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ तसेच धान्य वितरण कार्यालय नाशिक व मालेगाव या सर्व क्षेत्रांचा समावेश आहे.

सदर केरोसीन वितरणासाठी विविध कंपन्यांच्या अधिकृत डिलर्समार्फत तालुकानिहाय वितरण करण्यात येणार असून, संबंधित तहसीलदार व धान्य वितरण अधिकाऱ्यांनी वितरण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केरोसीन टँकर प्राप्त झाल्यानंतर तात्काळ संबंधित यंत्रणांनी उपस्थित राहून वितरणाची खात्री करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. केरोसीन वितरणासाठी कडक अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. परवानाधारकांनी दर ७ दिवसांनी साठा, वितरण व शिल्लक याची माहिती सादर करणे बंधनकारक राहील. केरोसीनचा वापर केवळ घरगुती कारणांसाठीच करण्यात यावा, अन्य वापरास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मंजूर कोट्याचे वितरण निर्धारित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असून, मुदतवाढ दिली जाणार नाही. वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी सर्व आदेशांची माहिती ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनाही आदेशांच्या प्रती उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केरोसीन वितरण प्रक्रियेत कोणतीही अनियमितता, गैरवापर किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित परवानाधारक व अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाकारी श्री. प्रसाद यांनी दिला आहे. तसेच सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना नियोजित प्रमाणात व वेळेत केरोसीन उपलब्ध करून द्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी केले आहे.