Gram panchayat Election राज्यातील 14 हजार 237 ग्रामपंचायतींसाठी दिवाळीत मतदान?;

Pune News जानेवारी ते डिसेंबर 2026 दरम्यानच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या (प्रशासक आणि ग्रामपंचायत सदस्यांचा) राज्यातील 14 हजार 237 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, प्रभाग रचनेचे संपूर्ण कार्यक्रम अंतिम होण्यासाठी उन्हाळातील मे महिना उजाडणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होते, त्यावर हरकती आणि आक्षेप मागवून काही दिवसांनी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होते. तोपर्यंत पावसाळ्याला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे या ग्रामपंचायतींसाठी दिवाळीत मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील 14 हजार 237 ग्रामपंचायतींचा कालावधी येत्या डिसेंबरपर्यंत संपणार आहे. यातील काही ग्रामपंचायतींवर प्रशासक आहे, त्यांचीही मुदत डिसेंबरअखेर पूर्ण होऊ शकते, अशा ग्रामपंचायतींचा अधिनियम, १९५८ मधील २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २२ अन्वये कलम १० मधील सुधारीत केलेल्या तरतुदीनुसार हा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम पुढीलप्रमाणे

तहसीलदारांनी गुगल अर्थचे नकाशे सुपर इम्पोज करुन प्रत्येक गावाचे नकाशे २० फेब्रुवारीपर्यंत अंतिम करणे, तसेच संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करुन २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करण्यात येणार आहे.

प्रारूप प्रभाग रचनेबाबत प्राप्त झालेल्या सर्व हरकती आणि सूचनांवर उपविभागीय अधिकारी हे २१ एप्रिलपर्यंत सुनावणी घेणार आहेत. आलेल्या प्रत्येक हरकती आणि सुचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले जाणार आहेत.

प्रभाग रचना अंतिम करणे

उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी हे २८ एप्रिलपर्यंत प्रभाग रचना अंतिम करुन राज्य निवडणूक आयोगास सादर करतील. राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी हे (नमुना अ मध्ये) चार मे रोजी प्रसिध्द करतील.