Mumbai news डहाणू नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवारांची नावे घेत, एवढे सर्व उमेदवार रस्त्यावर उतरले तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहाणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान दिले आहे
पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराला एकनाथ शिंदे यांनी आज सुरुवात केली. डहाणू येथील पहिल्याच जाहीर सभेतून एकनाथ शिंदे यांनी डहाणू नगरपरिषदेत परिवर्तनाच्या विकासाचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे भाकित वर्तवले. एकाधिकारशाही आणि अंहकार मोडून काढण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली असल्याचे आव्हान भाजपला दिले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डहाणू येथून पालघर जिल्ह्यातील प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर जव्हार आणि पालघर मधील आगरी मैदान येथे एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा झाल्या. डहाणूमधील लढत रंगतदार होत आहे. येथे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे) विरुद्ध भाजप असा सामना होत आहे.
सध्या महायुतीमध्ये नाराजीचं वातावर आहे. शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून तर थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्यात आला होता, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले, तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, सध्या शिंदे यांचा दिल्ली दौरा चांगलाच चर्चेत आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी भाजपावर आता थेट टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
डाहाणू नगर परिषद निवडणुकीमधील शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू माच्ची यांच्या प्रचारसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘एवढे उमेदवार आणि एवढे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, ज्या उमेदवारांनी आपले उमेदवार मागे घेतले त्यांचे अभिनंदन, या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा फडकणार आहे. लाडक्या बहिणी सत्ता उलटून टाकतात, डहाणूमध्ये जेवढा समुद्र मोठा आहे, तेवढी लोकांची मनं देखील मोठी आहेत. या सभेला जी गर्दी उसळली त्यावरून राजू माच्ची यांचा विजय निश्चित आहे, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.
