पुणेकरांनो सावधान! तीन वेळा नियम मोडल्यास लायसन्स रद्द

शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला दंड केला जावा. तसेच, तीनपेक्षा अधिक वेळा नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधिताचा वाहनचालन परवाना नियमानुसार रद्द करावा त्यानंतरही उल्लंघन केले गेल्यास सदर वाहन जप्त करण्याची कारवाई करावी, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी दिले आहेत.नवले पुलावरील अपघातानंतर प्रशासनाकडक कडक भूमिका घेतली जात आहे.

यापार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुधारणांबाबत विधानभवनात आयोजित आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार बोलत होते. ते म्हणाले की, नवले पुलाच्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघाताची कारणांची संबंधित यंत्रणांनी तत्काळ माहित घ्यावी. या मार्गावर आवश्यक त्या लघुकालीन व दीर्घकालीन उपाययोजना तत्काळ कराव्यात.

सेव्ह लाइफ फाउंडेशनने शहरात वाहतूक कोंडी, अपघात अधिक होणारे रस्ते, ठिकाणांविषयी अभ्यास करून रस्त्यांच्या डिझाइनमध्ये काही त्रुटी असल्यास उपाययोजना सुचवाव्यात. त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले. पुणे शहर वाहतूक शाखेने अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

तोपर्यंत वाहतूक शाखेच्या मागणीनुसार संबंधित रस्त्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने वाहतूक नियमनासाठी ट्रॅफिक वार्डन देण्याची जबाबदारी घ्यावी, आता झालेला गंभीर अपघात पाहता या मार्गाचा पुन्हा सविस्तर अभ्यास सेव्ह लाइफ फाउंडेशनने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने करावा, अशी सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी केली.

यावेळी पालिका आयुक्त नवल किशोर राम, प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते. सेव्ह लाइफ फाउंडेशनचे संस्थापक व मुख्यकार्यकारी अधिकारी पियुष तिवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना..
रस्ता सुस्थितीत ठेवणे, आवश्यक त्या उपाययोजना करणे, वाहतूक सुरळीत होईल, याची जबाबदारी यंत्रणांची आहे. रस्ता सुस्थितीत नसल्यास संबंधित यंत्रणेवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कारवाई करावी. रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी दरमहा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी व आधीच्या बैठकांमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांची कामे पूर्ण झाली की नाही, याची खात्री करावी, अशी सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.