News Baramati – श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी केली आहे. काही उमेदवारांच्या निवडीला विरोध असल्याने त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली असून, त्यांच्या बंडखोरीमुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
गेल्या १२ वर्षांपासून कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेमुळे सोमेश्वरच्या निवडणुकीला आता वेगळे वळण मिळाले आहे. दरम्यान, भाजपाचे माजी आमदार संजय जगताप हे पुरुषोत्तम जगताप यांच्या मेळाव्याला उपस्थित आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
अध्यक्ष जगतापांचं बंड, राष्ट्रवादीच्या राजकारणात नवी फूट
काकडे-जगताप संघर्षाची जुनी पार्श्वभूमी, तसेच काकडे गटाचे पवार कुटुंबीयांशी असलेले राजकीय संबंध यामुळेही या बंडखोरीला वेगळे संदर्भ प्राप्त झाले आहेत. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात बदललेली समीकरणे आणि आता सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील पुरुषोत्तम जगताप यांची बंडखोरी यामुळे बारामतीतील राष्ट्रवादीच्या राजकारणात नवी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बंडखोरीचा निवडणुकीवर काय परिणाम होणार?
आता पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेला किती उमेदवारांची साथ मिळते आणि या बंडखोरीचा सोमेश्वर कारखाना निवडणुकीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२१ संचालक पदांसाठी तब्बल ५१४ उमेदवारी अर्ज
२१ संचालक पदांसाठी तब्बल ५१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, माघारीच्या अंतिम दिवशी म्हणजेच आज ३० सप्टेंबर रोजी ५११ अर्ज शिल्लक आहेत. आतापर्यंत केवळ तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. दरम्यान, विविध राजकीय गटांकडून मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यात आले असले तरी अद्याप कोणत्याही गटाने अधिकृत पॅनल जाहीर केलेले नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना एकत्र आणण्याच्या चर्चेला अद्याप यश आले नसल्याची माहिती आहे.
