Pune बिडकरांचा सूर बदलला! ‘तू-तू, मैं-मैं’नंतर भाजप-राष्ट्रवादीत पुन्हा समन्वय
पुणे | प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या राजकारणात अवघ्या आठवडाभरातच राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. नगरसेवकांच्या विकासनिधीच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद आता समन्वयाच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि तक्रारी करणारे स्थानिक नेते आज मात्र एकाच व्यासपीठावर दिसत असल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या विकासनिधीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. कोथरूडमधील विकासकामांच्या चौकशीसाठी बालवडकर यांनी मांडलेल्या प्रस्तावावर सुहास टिंगरे यांनी स्वाक्षरी केली होती. यानंतर विकासनिधीचा मुद्दा चांगलाच तापला आणि भाजप-राष्ट्रवादीतील स्थानिक राजकीय संघर्ष उघडपणे समोर आला.
या पार्श्वभूमीवर भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती नसल्याची भूमिका स्पष्ट केली होती. राज्य आणि केंद्रात दोन्ही पक्ष एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर परिस्थिती वेगळी असल्याचे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले होते.
वाद वाढत गेल्यानंतर दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून वरिष्ठांकडे तक्रारी पोहोचल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांबाबत तक्रार केल्याचे समोर आले. त्यानंतर गणेश बिडकर आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांविरोधात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केल्याची चर्चा झाली.
मात्र, अवघ्या काही दिवसांतच या संघर्षाचे चित्र बदलले आहे. आज पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची समन्वय बैठक होत असून, महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर, राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची उपस्थिती आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पहिले चित्र महापालिकेत लावण्यासाठी जागेची पाहणी करतानाही भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र दिसले. काही दिवसांपूर्वी एकमेकांविरोधात तक्रारी करणारे नेते आज मात्र खांद्याला खांदा लावून पाहणी करताना दिसल्याने या बदलाची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, भाजप-राष्ट्रवादीच्या युतीबाबत गणेश बिडकर यांना विचारले असता त्यांनी, “राज्यात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आहे,” अशी भूमिका मांडली. त्यामुळे आठवडाभरापूर्वी महापालिकेत युती नसल्याचे सांगणाऱ्या बिडकरांचा सूर आता का बदलला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विकासनिधीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद, त्यानंतर वरिष्ठांकडे झालेल्या तक्रारी आणि आता अचानक झालेली समन्वय बैठक—या संपूर्ण घडामोडींकडे राजकीयदृष्ट्या पाहिले जात आहे. वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही बाजूंनी संघर्षाची भूमिका मवाळ केली का? स्थानिक पातळीवरील मतभेद बाजूला ठेवून आगामी राजकीय समीकरणांसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का? याबाबत महापालिका वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
आठवडाभरापूर्वी ‘युती नाही’ म्हणणारे बिडकर आज ‘राष्ट्रवादी आमच्यासोबत’ म्हणत असल्याने भाजप-राष्ट्रवादीतील हा बदल नेमका राजकीय समन्वयाचा संकेत आहे की वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर झालेली दिलजमाई, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
