Pune हिंजवडीतील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लक्ष्मी चौकात उड्डाणपूल उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार केला असून, त्यावर सूचना आणि अभिप्राय घेण्यासाठी तो PMRDA आणि MIDCकडे पाठवण्यात आला आहे.
लक्ष्मी चौक हा हिंजवडी परिसरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. विविध दिशांनी येणारे रस्ते या ठिकाणी एकत्र येत असल्याने सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी नेमकी कोणत्या यंत्रणेकडे असणार, याबाबत गेल्या काही काळापासून स्पष्टता नव्हती.
11 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर प्रकल्पाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. प्रस्तावित पुलाच्या आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात केले जाणार असून, त्यानंतर अंतिम डिझाइन निश्चित करण्याची प्रक्रिया पुढे जाईल.
दरम्यान, वाहतूक व्यवस्थेचा विचार करून उड्डाणपुलासाठी सध्या 3 पर्यायांचा अभ्यास केला जात आहे. यापैकी वाहतुकीसाठी अधिक प्रभावी आणि व्यवहार्य पर्याय निवडला जाणार आहे. लक्ष्मी चौक परिसरातील बहुतांश रस्ते MIDCच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्या सूचनांनाही महत्त्व दिले जात आहे. PMRDAकडूनही अभिप्राय मागवण्यात आला आहे.
प्रकल्पासाठी आवश्यक असलेले भूसंपादन येत्या 2 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच डिसेंबरपासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले आहेत. त्यामुळे आराखडा अंतिम झाल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्या माहितीनुसार, लक्ष्मी चौकातील कोंडी कमी करण्यासाठी कोणता पर्याय सर्वाधिक फायदेशीर ठरेल, याचा सध्या तांत्रिक पातळीवर अभ्यास सुरू आहे.
