अनधिकृत बांधकामांवर आता हातोडा? अधिकाऱ्यांनाही दणका; Anna Bansode यांचे कडक निर्देश

Pune Anna Bansode कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (KUADA) कार्यक्षेत्रातील विनापरवाना आणि अनधिकृत बांधकामांवर केवळ नोटिसा बजावून प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना आता जबाबदार धरले जाणार आहे.

अनधिकृत बांधकामांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यास दिरंगाई किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे कडक निर्देश महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. (Anna Bansode)

विधानभवनातील अण्णा बनसोडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तसेच प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. वळीवडे, उंचगाव, गांधीनगर, चिंचवाड आणि मुडशिंगी या गावांमधील विनापरवाना बांधकामांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची बैठकीत माहिती घेण्यात आली. संबंधित बांधकामांना बजावलेल्या नोटिसा, करण्यात आलेले पंचनामे, दाखल झालेले गुन्हे आणि न्यायालयीन प्रकरणांची सद्यस्थिती याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. (Anna Bansode)

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती, आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई, प्रलंबित प्रकरणे तसेच पुढील प्रस्तावित कार्यवाही यांचा सविस्तर अहवाल २८ ते २९ ऑगस्टपर्यंत सादर करावा, असे स्पष्ट निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला आता वेग येण्याची शक्यता असून, दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.